पुरंदर रिपोर्टर Live
बारामती│प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील खामगळवाडी ग्रामस्थांच्या दशकभराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. शासनाने खामगळवाडीला ढाकळे ग्रामपंचायतीपासून वेगळे करून स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून मान्यता दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे गावाच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे.
ग्रामपंचायत स्वतंत्र करण्यासाठी खामगळवाडीतील स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे सभा, बैठका, निवेदनं आणि शासनदरबारी पाठपुरावा केला. प्रशासकीय अडचणी, निधीवाटपातील मर्यादा आणि स्थानिक समस्यांकडे दुर्लक्ष यामुळे स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी अधिक तीव्र झाली होती.
या लढ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे थेट सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पाठिंब्यामुळे हा प्रशासकीय निर्णय वेगाने पुढे गेला. अखेर शासनाने अधिकृत मान्यता देत खामगळवाडीचा स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून जन्म झाला.
गावातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला बचतगट, युवक मंडळे आणि सर्वसामान्य ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत ग्रामस्थांनी जल्लोष केला. अनेकांनी हा केवळ प्रशासकीय बदल नसून गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा मजबूत पाया असल्याचे मत व्यक्त केले.
स्वतंत्र ग्रामपंचायतीनंतर आता खामगळवाडी आपला स्वतंत्र विकास आराखडा तयार करून रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, शिक्षण, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वेगाने पावले उचलणार आहे. ग्रामस्थांचा विश्वास आहे की एकजुटीने काम करून खामगळवाडी आदर्श विकासाचे केंद्र बनेल.
0 Comments